Advertisement

केवायसी करूनही अनेक शेतकर्‍यांना नाही लाभ

प्रजापत्र | Monday, 13/06/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी विविध त्रुटींमुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. संबंधित खात्याने या त्रुटीची दुरुस्ती करून या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जात आहेत. वर्षातून तीन वेळा एकूण सहा हजार रुपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात. संबंधित  व्यक्तीची ओळख पटावी यासाठी शासनाने 31 मे 2022 पर्यंत आधार कार्डसह इतर कागदपत्रे जोडून केवायसी करणे बंधनकारक केले होते.
                 याबाबत शासनाने अनेकदा आवाहनही केले होते. केवायसी न केलेल्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार असे स्पष्ट केले होते. पण अनेक शेतकर्‍यांचा आधार कार्डसोबत मोबाइल लिंक नाही, त्यामुळे त्यांना तालुक्याला जाऊन सीएससी सेंटरमध्ये बायोमेट्रिक केवायसी करावी लागत आहे. अंगठे जुळत नसल्याने ई-केवायसीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अर्ज भरताना काही शेतकर्‍यांचा आधार नंबर चुकीचा तर काहींचा बँक खाते नंबर, आयएफसी कोड नंबर चुकीचा आहे. काहींचे आधार कार्ड व अर्जातील नाव जुळत नाही, काहींचा पत्ता चुकीचा अशा अनेक त्रुटींमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. केवायसी करूनही काही शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने या योजनेबाबत तक्रार कुठे करायची असा प्रश्न  शेतकर्‍यांना पडत आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना अजूनही केवायसीबाबत माहिती नाही. संबंधित खात्याने या योजनेंतर्गतएकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी तालुका स्तरावर मार्गदर्शन व त्रुटी दुरुस्ती शिबिरे आयोजित केली पाहिजेत.

Advertisement

Advertisement