Advertisement

गाडी अडवून मारहाण करत दागिने व रोकड केली लंपास

प्रजापत्र | Saturday, 07/05/2022
बातमी शेअर करा

केज दि.७ – तालुक्यातील केज बीड रोडवरील मस्साजोग शिवारात शनिवारी पहाटे गाडी अडवून गाडीच्या चालकासह इतर दोघांना मारहाण करत दागिने व रोकड असा ७४००० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून केज पोलीसांत सात ते आठ अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

              अधिक माहिती अशी की, रेणापूर तालुक्यातील निवाडी येथील लक्ष्मीकांत विश्वनाथअप्पा उरगुंडे हे एक कार्यक्रम आटोपून दि.७ रोजी कुटुंबासह गावाकडे निघाले होते. दरम्यान त्यांची गाडी मस्साजोग शिवारातील पिंपळगाव पाटीजवळ पहाटे चार वाजता आली असता रस्त्यावर त्यांना लोखंडी जॅक दिसून आल्याने चालकाने गाडी थांबवली. मात्र त्याचवेळी दबा धरून बसलेल्या सात ते आठ अज्ञातांनी गाडी चालकास बाजूच्या शेतात नेऊन मारहाण केली गाडीतील इतर प्रवासी खाली उतरले असता त्यांनाही काठीने मारहाण करून पैसे और सोना दे दो म्हणत पंचवीस हजारांचे दागिने व ४९००० नगदी असा एकूण ७४ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला.

            दरम्यान सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर एएसपी पंकज कुमावत व कविता नेरकर यांनी केज पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेत तपासा बाबत सूचना केल्या आहेत. तर पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे हे करत आहेत.

Advertisement

Advertisement