धारुर : तालुक्यातील खोडस येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने खोडस येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.आशोक तुकाराम लाखे ( वय ४५ वर्ष ) रा. खोडस ( ता. धारुर ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलोपार्जित ४ एक्कर शेती असून कितीही कबाड कष्ट करूनही बँकेचं व सोसायटीचे कर्ज फिटत नाही. या नैराश्यातून अशोक लाखे यांनी रविवारी ( दि. १ ) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेतात प्रोफेक्स नावाचं विषारी द्रव्य प्राशन केले. यानंतर त्रास होऊ लागल्याने भावकीतील एकास विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती दिली. त्यांनी दुचाकीवर बसवून तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी ( दि. ४ ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. गुरुवारी ( दि. ५ ) सकाळी खोडस येथे अंत्यविधी करण्यात आला. यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी, एक मुलगा, आई असा परिवार आहे.
बातमी शेअर करा