किल्लेधारूर दि.२(वार्ताहर)-तालुक्यातील आवरगाव हे गाव बीड जिल्ह्यात स्मार्ट ग्राम म्हणून ओळखले जाते. सध्या आवरगाव परिसरात मात्र भुरट्या चोऱ्या वाढल्याचे दिसून येत असून सोमवारी (दि.२) धारुर पोलिसांत एका चोरीची नोंद झाली.
आवरगाव हे सध्या बीड जिल्ह्यात मॉडेल गाव ठरत असताना या गावातील सरपंच कुटूंबासह इतर ग्रामस्थ सध्या शेतात होत असलेल्या चोऱ्यामुळे चिंतातूर आहेत. गावात उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या आवरगाव ग्रामस्थांना भुरट्या चोरांचे नियोजन अद्याप करता आलेले नाही. पोलिसांनी या भुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप यांनी केली आहे.गेल्या काही दिवसात आवरगावमध्ये शेत शिवारातील पाण्याची मोटार, सौर उर्जा प्रकल्पाच्या प्लेट व वायर चोरीच्या घटना घडल्या. पोलिसांत या चोरीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. दि.२२ एप्रिल रोजी आशोक नवनाथ नखाते यांच्या फिर्यादीवरुन १५४०० रुपये किमतीची तलावातून शेतीला पाणी पुरवठा करणारी पाण्याची विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि.२३ एप्रिल रोजी ज्ञानेश्वर श्रीराम नखाते यांच्या तक्रारी वरुन विहिरीवर पाण्यासाठी वापरलेल्या सुमारे १३ हजार रुपये किमंतीचे इंडेक्स कंपनीचे विद्युत सर्विस केबल वायर अज्ञात चोरट्यांने पळवल्याची तक्रार धारुर पोलिसांत नोंद झाली. यानंतर सोमवार दि.२ मे रोजी महादेव सर्जेराव जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.जगताप यांच्या फिर्यादीनूसार आवरगाव शिवारातील त्यांच्या मालकीच्या शेत जमिनीत विहिरिवर सौर उर्जेचे २२ पॅनेल प्लेट बसवलेले आहेत. रात्री यातील ९ पॅने ल प्लेट चोरीला गेल्याचे सकाळी निदर्शनास आले. त्यांच्या तक्रारीनूसार १ लाख ८ हजार रुपये किंमतीचे ९ पॅनेल प्लेट अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. अवघ्या दहा दिवसात तीन चोऱ्या धारुर पोलिसांत नोंदवण्यात आल्या आहेत. चोरट्यांचा पुढील तपास धारुर पोलिस करत आहेत.