केज-अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालेला असला तरी शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहु देणार नाही. त्यासाठी कारखान्यांना अनुदान देऊ असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी कारखान्याच्या विस्तारित आसवणी (डिस्टीलरी) प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील,पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ.प्रकाश सोळंके, आ.संदीप क्षीरसागर, आ.संजय दौंड,युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, अमरसिंह पंडित,सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, विजयसिंह पंडित,डॉ.नरेंद्र काळे, नारायण शिंदे, प्रकाश महाराज बोधले यांची यावेळी उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले की, साखर कारखानदारीने महाराष्ट्राला दिशा दिली आहे. पण आपल्या भागाला दुष्काळ कायमचा आहे. बजरंग सोनवणेंना आम्ही कर्ज दिलं, त्याचा वापर त्यांनी समाजासाठी केला.कारखाना चांगला चालवला याचा आनंद आहे, म्हणूनच आम्ही आलोय असे पवार म्हणाले. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मोठा झाला आहे. ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय कारखाने बंद करु नका,वाहतूक,रिकव्हरी अनुदान देऊ पण शेतकऱ्याचा ऊस राहू देऊ नका असे अजित पवार म्हणाले. पाणी असेल तितकाच ऊस लावा असेही पवार म्हणाले.महागाई वाढतेय याची केंद्र सरकारला लाज वाटत नाही का? आम्ही राज्य म्हणून प्रयत्न करतोय, पण केंद्र सरकार काय करतय असा सवालही पवारांनी विचारला.
बजरंग सोनवणेंना मोठी संधी
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदावरुन बजरंग सोनवणेंना बदलण्यात आले. मात्र त्यांना पक्षात लवकरच मोठी संधी मिळेल. त्यासाठी मी स्वतः प्रदेशाध्यक्षांकडे पाठपुरावा करेल असा शब्द अजित पवार यांनी दिला.