धारूर दि.७ (वार्ताहर)-पोलीस स्टेशन हद्दीतील उमराई वस्तीवर सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत आणि धारूर पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकून दोन परप्रांतियांना ताब्यात घेतले. यातील एकाकडे तब्बल 13 लाख 21 हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर पाच जणांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
धारूर पोलीस हद्दीत उमराई वस्तीवर पाच संशयित परप्रांतीय असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून गुरूवारी (दि.7) सकाळी सहा वाजता धारूर पोलीसांना सोबत घेऊन पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी तेथील एका परप्रातीय व्यक्तीकडे 13 लाख 21 हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. या प्रकरणात पाच जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धारूर पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. ते परप्रांतीय येथे केव्हा आले? कशा साठी आले? ते नेमके करतात काय? लाखो रूपयांची रोख रक्कम आली कुठून? यासह अन्य प्रश्नांची उत्तरे पोलिसांना हवी आहेत.