किल्लेधारूर दि.29 मार्च - धारुर तालुक्यातील पिंपरवाडा येथे घरातील गॕसचा स्फोट होवून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि.29 मंगळवारी दुपारी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर तालुक्यातील पिंपरवाडा येथे श्रीहरी तिडके यांचे गावाजवळ पत्र्याचे घर आहे. श्रीहरी यांच्यासह लागुनच त्यांचे भाऊ रामकिसन तिडके यांचेही घर आहे. श्रीहरी तिडके यांच्या घरात आज दुपारी 1 च्या सुमारास अचानक घरगुती वापराच्या गॕसचा स्फोट झाला. यावेळी घरात रविराज श्रीहरी तिडके हा २२ वर्षीय तरुण होता. स्फोटाने रविराज लांब फेकला गेला व यातच त्याचा मृत्यू झाला.
स्फोटानंतर घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ग्रामस्थांनी तात्काळ तरुणाला धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यानी सदर तरुण जागीच गतप्राण झाल्याचे सांगितले. अनेक ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती कळताच धारुर नगर परिषद व केज नगर पंचायतच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून नुकसानीची माहिती अद्याप कळू शकली नाही.