अंबाजोगाई दि.२८ (वार्ताहर)-तालुक्यातील साकुड येथील एका नवरदेवाने हळदीच्या कार्यक्रमात फिस्तुलमधून हवेत गोळीबार करत दहशत माजवली.शनिवारी रात्री ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी नवरदेवासह इतरांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी भास्कर चाटे (रा.साकुड ता.अंबाजोगाई) असे त्या नवरदेवाचे नाव आहे. त्याच्या हळदीच्या समारंभात बाबा शेख (रा.क्रांतीनगर, रा.अंबाजोगाई) व इतर काही लोक उपस्थित होते. यावेळी बालाजी चाटे यास खांद्यावर घेऊन मित्र परिवार नाचत असताना त्याने अतिउत्साहात अवैधरीत्या बाळगलेल्या पिस्तूलमधून इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करून हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंबाजोगाई शहर पोलिसांनी दोन पंचांसमक्ष सायली लॉन्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बालाजी चाटे हा हवेत गोळीबार करताना दिसून आला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गोविंद येलमटे यांच्या फिर्यादीवरून बालाजी चाटे यासह इतर विरोधात भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सुर्यवंशी हे करीत आहेत.