बीड : बीड जिल्ह्यासह राज्यात धुमाकूळ घातलेल्या साखळी चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीवर तब्बल २७ पेक्षा अधिक गुन्हे असून टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील असा अंदाज बीडचे प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या काही काळात साखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. जिल्ह्यात साखळी चोरीचे ५ गुन्हे दाखल झाले होते, यातील चार बीडच्या शिवाजीवर पोलीस ठाण्यात तर एक अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या टोळीच्या मागावर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ , उपनिरीक्ष दुल्लत आणि त्यांची टीम होती. मात्र गुन्हा करण्याच्या अभिनव पद्धतीमुळे ही टोळी हाती लागत नव्हती. अखेर तब्बल १६०० किलोमीटर पर्यंत पाठलाग करून पोलिसांनी टोळीच्या म्होरक्यासह चौघांना अटक केली आहे. एलसीबीच्या पथकाने पुणे येथून ही टोळी पकडल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. यामुळे आता साखळी चोरीच्या घटना कमी होतील अशी अपेक्षा देखील लांजेवार यांनी व्यक्त केली.