बीड : मनोहर कांबळे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेच्या संदर्भाने माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पकड वॉरंट काढले आहे. विशाल भोसले यांना ४ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
माजलगाव नगरपालिकेच्या संदर्भाने मनोहर कांबळे यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. रवींद्र घुगे आणि न्या. एस जी मेहरे यांच्या पीठासमोर सुरु आहे. या प्रकरणात माजलगावचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे गैरहजर राहिल्याने उच्च न्यालयाने अखेर त्यांच्या विरोधात पकड वॉरंट काढले आहे. सदर वॉरंट हे जामीनपात्र असून पोलिसांनी त्यांना पकडून २५ हजाराच्या जामिनावर सोडावे आणि ४ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर करावे असे वॉरंट काढण्यात आले आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.