Advertisement

धारुर माजलगाव रस्त्यावर भीषण अपघात

प्रजापत्र | Saturday, 19/03/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.19 मार्च – धारुर (Dharur) – माजलगाव राष्ट्रीय महामार्ग (क्र.548 सी) या रस्त्यावर इर्टीगा कार व दुचाकीचा भीषण अपघात (Accident) होऊन यामध्ये दुचाकीवरील दोघे ठार तर 10 वर्षांच्या मुलासह 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना बीड व‌ अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

 

 

माजलगाव ते अंबाजोगाई असा दररोज प्रवास करणाऱ्या शिक्षकांच्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात लक्ष्मण भिमराव विघ्ने (वय 45), सिध्देश्वर प्रल्हाद जाधव (वय 35) हे दोघे ठार झाले आहेत. हे दोघे व सिध्देश्वर यांचा दहा वर्षाचा मुलगा इश्वर जाधव हे तिघे पाहूण्याना भेटून दुचाकीवरुन येत होते.

 

 

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 548 सी वरील तेलगाव – माजलगाव दरम्यान शिंदेवाडी जवळ इर्टीगा कार व दुचाकीचा अपघात झाला. दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात पडली. यामध्ये दुचाकीवरील तिघांना गंभीर मार लागल्याने लक्ष्मण विघ्ने आणि सिध्देश्वर जाधव हे ठार झाले. तसेच इश्वर जाधव (वय 10) हा गंभीर जखमी झाला.

 

 

या अपघातात इर्टीगा कार ही खड्ड्यात जाऊन पडली असून यातील नामदेव हेडे ( वय 44 ), परमेश्वर खेमाजी पवार (वय 45), प्रीती विनोद पोखरकर (वय 35), भारत अबाजी माने, किशोर रामभाऊ ठाकुर (वय 37), ज्योती शंकर कदम जखमी आहेत. हे सर्व माजलगाव येथील सिध्देश्वर विद्यालयात शिक्षक आहेत.

 

 

अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सर्व जण दररोज अंबाजोगाई माजलगाव (Ambajogai Majalgoan) असा प्रवास करतात. आजही नेहमी प्रमाणे शाळेला जाताना शिंदेवाडी फाट्यावर ही घटना घडली आहे. सर्व जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती (SRTR) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
(Terrible accident on Dharur Majalgaon road; Two killed and six injured.)

Advertisement

Advertisement