केज दि.१२ (वार्ताहर)- केज दि.१२ – घरातून निघून गेलेल्या ८७ वर्षीय पुरुषाचा हाडाचा सांगळा आपेगाव ( ता. अंबाजोगाई ) शिवारातील उसाच्या पिकात आढळून आला. सदर इसमाजवळ असलेल्या मतदान ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली असून बंकट दाजी पवार ( रा. सोनीजवळा ता. केज ) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
केज तालुक्यातील सोनीजवळा येथील बंकट दाजी पवार ( वय ८७ ) यांच्या डोक्यावर परिणाम झालेला होता. त्यांना ऐकू येत नव्हते. ते नेहमी वेडाच्या भरात निघून जात होते. नातेवाईक त्यांचा शोध घरी घेऊन येत. मात्र २७ जानेवारी २०२२ रोजी बंकट पवार हे घरातून बेपत्ता झाले होते. चार दिवस नातेवाईकांनी शोध घेतला असता ते मिळून न आल्याने युसुफवडगाव पोलिसात ३१ जानेवारी रोजी मिसिंगची नोंद करण्यात आली होती. पोलीस नाईक परमेश्वर शिंदे यांनी नातेवाईकांकडे शोध घेऊन शेवटी शोधपत्रिका काढून ही त्यांचा तपास लागलेला नव्हता.
दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील शेतकरी सूर्यकांत वसंत शिंदे यांच्या शिवारातील शेतातील ऊसतोडणी करण्यासाठी ऊसतोड मजूर शनिवारी सकाळी गेले होते. ऊस तोडत असताना ऊसतोड मजूर दिनकर सतिष पवार ( रा. कोथळा ता. कळंब जि. उस्मानाबाद ) या मजुराने उसाच्या फडात मानवी हाडाचा सांगळा आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, पोलीस नाईक परमेश्वर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सांगळ्याच्या अंगावरील कपड्याची झडती घेतली असता खिशात बंकट दाजी पवार ( वय ८७, रा. सोनीजवळा ता. केज ) या नावाचे मतदान ओळखपत्र पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले असता त्यांच्या अंगावरील कपड्यावरून सदर सांगळा हा बंकट पवार यांचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ऊसतोड मजूर दिनकर सतिष पवार यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.