बीडः जिल्ह्यातील वाळूबळी, देवस्थान जमीन घोटाळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेला गोळीबार आणि एकंदरच बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर आज विधानसभेत चर्चा होणार आहे. आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे यांनी दिलेली लक्षवेधी सुचना स्विकारण्यात आली असून त्यावर आता सरकार काय उत्तर देते याकडे सर्वांच्या नजरा असतील.
बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे मागच्या काही काळात तीनतेरा वाजले आहेत. वाढती गुन्हेगारी त्यासोबतच वाळूमाफियांचा धुमाकूळ, जिल्ह्यात गेलेले वाळूबळी, देवस्थान जमिनीचे घोटाळे आणि त्याचा धिम्यागतीने होणारा तपास, मंत्री बँकेचे प्रकरण यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेला गोळीबार असे सारे प्रश्न विधीमंडळात उपस्थित करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्याच जिल्ह्यातील तीन आमदारांनी ही लक्षवेधी उपस्थित केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात माफियाराज असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. माजी मंत्री पंकजा मुंडे, आ. विनायक मेटे यांनी या संदर्भात टिका केली होती. पण आता राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब आजबे यांनीच हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे उत्तर देताना सत्ताधाऱ्यांचिही गोची होणार आहे.
या लक्षवेधीवर विधानसभेत सकाळीच चर्चा अपेक्षित आहे.