Advertisement

रखडलेल्या रस्त्याच्या कामाने घेतला बळी

प्रजापत्र | Tuesday, 22/02/2022
बातमी शेअर करा

 

अंबाजोगाई - शहरातून गेलेल्या राष्ट्रीय मार्गाच्या कामास होणारा विलंब नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. सोमवारी (दि.२१) रात्री १२ वाजता यशवंतराव चव्हाण चौकात पाण्याच्या टाकीजवळ महामार्गाच्या लगत अर्धवट काम सोडलेल्या नालीत कार कोसळून २२ वर्षीय तरूण चालक ठार झाला. चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महामार्गाचे अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संतप्त नागरीकातून होत आहे. 

निलेश मधुकर पवार (वय २२, रा. मोरेवाडी, अंबाजोगाई) असे त्या मृत चालकाचे नाव आहे. कार भाड्याने देण्याचा निलेशचा व्यवसाय होता. सोमवारी रात्री तो कारमध्ये (एमएच १२ एचएन १२९५) डीझेल भरून यशवंतराव चव्हाण चौकाकडून घराकडे निघाला होता. तो पाण्याच्या टाकीजवळ आला असता रखडलेल्या महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना त्याची कार रस्त्याच्या खाली उतरली आणि अर्धवट बांधून लोखंडी गज उघडे सोडलेल्या नालीत कोसळली. या अपघातात निलेश गंभीर जखमी झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. 

पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर

निलेश हा माता-पित्याला एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. निलेश हा घरातील कर्ता तरुण पुरुष असल्याने त्याच्यावरच कुटुंबाचा भार होता. त्याच्या अपघाती मृत्यूने या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.

Advertisement

Advertisement