किल्लेधारूर दि.7 फेब्रुवारी - धारुर तालुक्यातील तेलगाव येथे एका खाजगी कंपनीत कर्मचारी असलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना रविवारी रोजी सांयकाळी उघडकीस आली.
धारुर तालुक्यातील तेलगाव येथे तीस वर्षीय तरुण परेश राजाराम देशपांडे हा खाजगी कंपनीच्या कामानिमित्त राहत होता. त्याने रविवारी (दि.6) रोजी राहत्या घरात बेडशिटने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यात खाजगी कंपनीच्या वतीने कामे सुरु आहेत. या खाजगी कंपनीत सदरील तरुण कर्मचारी असल्याची माहिती मिळाली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.
सदरील तरुण शनिवारीच पुण्याहून आल्याचे कळते. सदर मयत तरुण परेश राजाराम देशपांडे (वय 30) हा मुळचा सोलापुर जिल्ह्यातील शिरपुर ता. माळशिरस येथील रहिवासी आहे. राहत्या घरात त्याने गळफास घेतल्याचे कारखान्यातील इतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर दिंद्रुड पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी दिंद्रुड पोलिसांनी (Police) पंचनामा करत जबाब नोंदवले असून ठाण्यात आकस्मिक गुन्हा नोंद करण्यात आली. धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात मयत तरुणाचे प्रेत शवविच्छेदन करुन पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.