Advertisement

महाराष्ट्राच्या चित्ररथाला पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत पहिलं बक्षिस

प्रजापत्र | Friday, 04/02/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर  झालेल्या चित्ररथ प्रदर्शन सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला पहिलं बक्षिस मिळालं आहे. सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून उत्तर प्रदेशच्या  चित्ररथाचा गौरव करण्यात आला आहे. तर पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली आहे. महाराष्ट्राने राजपथावर राज्यातील जैवविविधतेचं दर्शन घडवणारा चित्ररथ सादर केला होता. राज्यातील जैवविविधता आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजातील समालोचन त्यामुळे या चित्ररथाला नेटकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली होती. ऑनलाईन व्होटिंगमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक पसंतीची मते मिळाली होती. त्यानंतर आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात महाराष्ट्राला पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत पहिलं बक्षिस देण्यात आलं आहे. यवतमाळच्या तरुणांनी साकारलेला हा चित्ररथ संपूर्ण देशवासियांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.

उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला सर्वश्रेष्ठ चित्ररथाचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला पुरस्कार मिळाला आहे. सीआयएसएफची बेस्ट मार्चिंग पथक म्हणून निवड करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने या पुरस्काराची घोषणा केली आहे. भारतीय नौदलाला सर्वश्रेष्ठ मार्चिंग पथक म्हणून निवडले आहे. तर पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत हवाई दलाला पहिला क्रमांक मिळाला आहे. शिक्षण मंत्रालय आणि नागरिक उड्डान मंत्रालयाला संयुक्त विजेते म्हणूनही घोषित करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशच्या रथात काय?
उत्तर प्रदेशाने यंदा काशी विश्वनाथाचं दर्शन घडवणारा चित्ररथ तयार केला होता. हा भव्यदिव्य रथही सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरला होता. यापूर्वी 2021मध्येही उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला पहिला पुरस्कार मिळाला होता. उत्तर प्रदेशने गेल्यावर्षी राम मंदिराचं प्रदर्शन घडवलं होतं.

जंगल की दुनिया साकारली
महाराष्ट्राच्या चित्ररथाने यंदा आगळावेगळा प्रयोग केला होता. महाराष्ट्राने ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित हा चित्ररथ तयार केला होता. या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. यावर फळांचा राजा आंबा, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राष्ट्रीय पक्षी मोर, फुलपाखरू इत्यादींच्या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. खार, सरडा झाड, वाघ आणि महाकाय फुलपाखरू धातूपासून बनविण्यात आले होते. झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा, असा संदेश महाराष्ट्राने दिला. जणू काही संपूर्ण जंगल की दुनियाच या चित्ररथावर अवतरल्याचा भास होत होता. महाराष्ट्राचा चित्ररथ नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तरूणांनी तयार केला होता. चांगला चित्ररथ बनवल्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आहे. या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची असून निर्मिती संचालक बिभीषण चावरे आहेत. त्यांच्या संकल्पनेतून ही जंगलची दुनिया चित्ररथावर साकारण्यात आली होती. तर, या चित्ररथाचं समालोचन बीग बी अमिताभ बच्चन यांनी केलं होतं.

कुणाला किती मते
संरक्षण मंत्रालयाने चित्ररथांची निवड करण्यासाठी ऑनलाईन व्होटिंग घेतली होती. यावेळी जम्मू-काश्मीरच्या चित्ररथाला 12 हजार 124 मते मिळाली होती. म्हणजे या चित्ररथाला 12 टक्के मते मिळाली होती. कर्नाटकाच्या चित्ररथाला 9 टक्के म्हणजे 9 हजार 25 मते मिळाली होती. महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक 23 टक्के म्हणजे 22 हजार 649 मते मिळाली होती. मेघालयाच्या चित्ररथाला 3451, पंजाबच्या रथाला 6116, उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला 22 टक्के म्हणजे 21 हजार 585 आणि उत्तराखंडच्या चित्ररथाला 4091 मते मिळाली होती.

Advertisement

Advertisement