केज :- घरातील सर्वजण देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून केज तालुक्यातील तांबवा येथे रात्रीच्या वेळी किराणा दुकानाचे शटर उचकटून कपाटातील दागिने आणि नगदी रोख रकमेसह सुमारे पाऊण लाखाची चोरी झाली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील तांबवा येथील शेषेराव गोवर्धन कराड हे त्यांची पत्नी, मुलगा व मुलीसह सर्व कुटुंब दि. 29 जानेवारी रोजी घराला व दुकानाला कुलूप लावून त्रिंबकेश्वर येथे देवदर्शनाला गेले होते. त्या दरम्यान दि. 1 फेब्रुवारी रोजी रात्री शेषेराव कराड यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यानी आत प्रवेश केला. नंतर दुकानातील लोखंडी कपाट उघडून त्यातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याचे गंठन, तीन अंगठ्या व नगदी आठ हजार रु. असा एकूण 73 हजार 500 रु चा मुद्देमाल लंपास केला. या बाबत शेषेराव कराड यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.नं. 29/2022 भा.दं.वि. 454, 457 आणि 380 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी या चोरी प्रकरणी घटना स्थळावर ठसे तज्ज्ञाला पाचारण करून गुन्ह्याचा तपास घेत आहेत.
बातमी शेअर करा