किल्लेधारूर दि.२८ (वार्ताहर) - धारुर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून अज्ञात वन्यप्राण्याची पशूपालकात दहशत आहे. तालूक्यातील पांगरी येथे तात्याराम दादाराव थोरात यांच्या गावानजीक शेतात बांधलेल्या आठ पैकी सहा बोकड अज्ञात प्राण्याने हल्ला करून जिवे मारल्याचे उघडकीस आले आहे.
धारुर तालुक्यात अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. पांगरी येथे घडलेल्या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे परीसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मृत सहा बोकडाचे शवविच्छेदन हि पशू वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत करण्यात आले.
तालूक्यातील पांगरी येथे गावाच्या दक्षिणेकडे गावा जवळच तात्याराम दादाराव थोरात यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात आठ बोकड बांधलेले होते. गुरूवारी रात्री उशीरा अज्ञात रानटी प्राण्याने या बोकडा वर हल्ला केला व आठ पैकी सहा बोकड या हल्ल्यात मृत झाले. हि घटना सकाळी शेतात गेल्या वर लक्षात आली.
आठ पैकी दोन बोकड जिवंत होते सहा बोकड मृत अवस्थेत आढळले. या घटनेमुळे आसपास चे शेतकऱ्यांत मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या पथकाने संभाजी पारवे यांच्या नेतृत्वा खाली घटनास्थळाला भेट दिली. प्राण्याचे ठसे पाहीले. हे ठसे लांडग्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बोकडाचे शवविच्छेदन करण्यात आले असून या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.