किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे आयोजित कबड्डी स्पर्धेत यश संपादन केले. त्यांच्या या विजयाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील इंडियन गेम्स ॲन्ड स्पोर्टस फेडरेशन अॉफ इंडिया यांच्या वतीने कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यात धारुर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कबड्डीपटूंचा समावेश होता.
यात सुरज माणिक लोखंडे, रोहन बजरंग वैरागे, आदिल काझी, रोहित लोखंडे, रोहित वैरागे, आर्यन वैरागे, प्रतिक मेंढके या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंनी पंजाब सोबत झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवून आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले स्थान पक्के केले.
या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने हरियाणा, मध्यप्रदेश व पंजाब संघाला धूळ चारली. राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केल्याने या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या खेळाडूंना महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक पल्लेवाड व रोहित पालवे यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी हे खेळाडू पात्र ठरले आहेत. पंजाब संघास नमवून सुवर्ण पदकाचे मानकरी ठरल्यामुळे या कबड्डीपटूंचे सर्वत्र कौतूक होत आहे.