केज दि.२३ – केज पोलीसांनी महाराष्ट्रात बंदी असलेले तंबाखूयुक्त पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक केज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कार्यवाहीत पोलीसांनी ट्रकसह एकूण २२ लाख साठ हजार रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
दि. २३ जानेवारी रोजी दुपारी ४:०० वा. केज पोलीस ठाण्याचे कर्मचारी गोरख फड यांना एका गुप्त खबऱ्याने फोनवरून माहिती दिली की, महाराष्ट्रात बंदी असलेल्या तंबाखू भरलेला ट्रक पुणे येथुन केज मार्गे पुढे जातअसल्याची माहिती गोरख फड यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांना दिल्याने साहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी त्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देताच पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी त्यांचे सहकारी गोरख फड, महादेव बहिरवाळ, समीर शेख यांना सोबत घेऊन केज-बीड रोडवर शासकीय विश्रामगृहा समोर सापळा लावून भरधाव वेगात जाणारा ट्रक क्र. (एमएच-४६/एफ-१४१६) हा पाठलाग करून पकडला. सदर ट्रकमध्ये २८ किलो ग्रॅम वजनाचे १५० पोते भरलेला सुगंधी तंबाखूचा माल आहे त्याची किंमत १२ लाख ६० हजार रु असून ट्रकसह एकूण २२ लाख ६० हजार रु. चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दरम्यान, पोलीस कर्मचारी शेख यांच्या फिर्यादी वरून ट्रक ड्रायव्हर विलास केसकर ता. चिखली जि. बुलढाणा याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.