Advertisement

आजपासून आठवडे बाजार बंद

प्रजापत्र | Sunday, 16/01/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर)-बीड जिल्हा प्रशासनाने जमाव बंदी आदेश काढल्यामुळे आता बाजारतळावर बाजार भरवण्यास बंदी असणार असून नगर परिषदेकडून तसे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. राज्य सरकारने निर्बंध कडक करत राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी जाहिर केली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी आजपर्यंत आठवडे बाजार भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आता स्थानिक प्रशासन सतर्क झाले असल्याचे दिसून येत आहे.

 

धारुर शहरात सोमवार व शुक्रवार हे दोन आठवडे बाजार आहेत. जमावबंदी आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाच्या निर्देशानंतर नगर परिषदेकडून शुक्रवारी बाजार भरवण्यास मनाईचे आवाहन करण्यात आले. यामुळे आता शहरातील दोन्ही आठवडे बाजार आजपासून बंद राहणार आहेत.
मात्र फळविक्रेते, भाजी विक्रेते यांना गल्ली बोळात फिरुन विक्री करण्यास परवानगी असणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन गर्दी होणार नाही याची काळजी घेत आता भाजी व फळ विक्री करावी लागणार आहे. जमावबंदी आदेशाची व कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी तब्बल १२५ कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर धारुर तालुक्यात गेल्या तीन दिवसात ७ रुग्ण आढळले आहेत तर एका कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे स्थानिक प्रशासन कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे.

Advertisement

Advertisement