केज - उसने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी अल्पवयीन मुलास त्याची कुटुंबातील व्यक्तीवरून अपशब्द वापरत मारहाण केली. अपशब्द जिव्हारी लागल्याने दुखावलेल्या त्या मुलाने बाथरूममध्ये जाऊन शर्टाने गळफास घेतला. केज तालुक्यातील बनकारंजा येथील सदरील घटनेत दोघा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
विक्रम वसंत लांब (वय १७, रा. बनकारंजा, ता. केज) असे त्या मयत मुलाचे नाव आहे. विक्रमच्या वडिलांचे कुंबेफळ शिवारात हॉटेल आहे. रविवारी (दि.०९) सायंकाळी ५ वा. त्याचे वडील पाणबुडी मोटर बसवण्यासाठी शेतात गेल्याने विक्रम हॉटेल सांभाळत होता. यावेळी गावातील बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाव लांब ( नागरगोजे) हे दोघे हॉटेलवर आले. त्यांनी विक्रमकडे दोन हजार रुपये उसने देण्याची मागणी केली. परंतु, जवळ पैसे नसल्याने विक्रमने त्यांना नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या त्या दोघांनी विक्रमजवळ कुटुंबातील व्यक्तीबद्दल अपशब्द वापरले आणि आणि त्याला चापटाबुक्याने मारहाण केली. वडील शेतातून आल्यानंतर विक्रमने रडत रडत त्यांना घडलेली घटना सांगितली. वडिलांनी त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु अपशब्द जिहारी लागल्याने विक्रम शांत होत नव्हता. त्यानंतर घरी असताना रात्री ९ वाजता विक्रमने बाथरूममध्ये जाऊन खिडकीला अंगावरील शर्टाच्या साह्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी विक्रम बाहेर येत नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने विक्रमला रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी वसंत लांब यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात कलम ३०५, ३२३, ३४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला