Advertisement

'त्या' बालकाचा खून

प्रजापत्र | Tuesday, 04/01/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर- तालुक्यातील सोनिमोहा येथे एका 6 वर्षाच्या बालकावर अज्ञात वन्यपशूने हल्ला झाल्याची चर्चा सोमवारी (दि.3) झाली होती. मात्र सदरील प्रकार हा वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा नसून खूनाचा (Murder) असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून अज्ञात व्यक्ती विरोधात धारुर पोलिसांत रात्री उशिरा खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार धारुर (Dharur) तालुक्यातील सोनिमोहा येथे गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत सहा वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे हा बालक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. यशराजच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या होत्या.

नातेवाईकांनी जखमी यशराजला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात (SRTR) उपचारासाठी दाखल केले. मात्र रविवारी रात्री उपचार सुरु असताना बालकाचा मृत्यू झाला. बालकाचे वडिल दत्तात्रय आश्रोबा दराडे यांचा शेळी व मेंढीपालनाचा व्यवसाय आहे.

सदरील प्रकाराची गावात अज्ञात वन्य प्राण्याचे हल्ला केल्याची चर्चा होती. सदर प्रकारानंतर पोलिस प्रशासनासह वन विभागाने प्रकाराची सखोल चौकशी केली. केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा अतिरिक्त पोलिस अधिक्षक (Additional Superintendent of Police) पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक वैद्यकीय अहवालानूसार पोलिसांनी तपास सुरु केला.

पोलिसांनी घटनास्थळ पिंजून काढला. यावेळी वनविभागाचे अधिकारी (Forest Department) कर्मचारीही हजर होते. यात वन्यप्राण्याचे कसलेही ठसे अथवा खानाखूणा आढळून आले नाहीत. बालकाचा गळा चिरला गेला असल्याने सदरील प्रकार हा खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री उशिरा धारुर पोलिसांत (Police) अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

धारुर पोलिस ठाण्याचे प्रभारी नितिन पाटील सध्या रजेवर असल्यामुळे या घटनेचा तपास बीड येथील पोलिस निरिक्षक Police Inspector) पुरुषोत्तम चोबे यांच्याकडे देण्यात आला आहे. सदर प्रकारानंतर पोलिसांची वाढलेली वर्दळ पाहता सोनिमोहा गावात खळबळ उडाली आहे. मात्र सदर प्रकरणाचा उलगडा पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

Advertisement