अहमदनगर दि.27 – मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या संकटाचे ढग आणखी गडद होताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात काल म्हणजेच 26 डिसेंबर 2021 रोजी तब्बल 31 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर आज पुन्हा एकदा याच नवोदय विद्यालयातील आणखी 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
या विद्यालयातील बाधितांचा आकडा आता 70 वर गेला आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या विद्यालयात एकूण 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर नवोदय विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्याांची संख्या तब्बल 70 वर पोहोचल्यामुळे येथील यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील इतर विद्यार्थ्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन नवोदय विद्यालय प्रशासन तसेच स्थानिक आरोग्य विभागाने केले आहे.