राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे पावसाळी कांदा मातीमोल दराने विकला जाऊ लागला असून हजारो रुपये खर्चून घेतलेले पीक कवडीमोल दराने विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. पावसाळा संपल्यानंतर या पावसाळी कांद्याला बाजारात चांगला दर मिळत असतो. त्यामुळे शेतकरी कांद्याचे पीक घेतात. मात्र, गेले तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतातील कांदा भिजून गेला आहे.
कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील कांदा काढून बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. पावसाळी कांद्याला शनिवारी पंढरपूर बाजार समितीमध्ये १०० रुपयांपासून १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. मात्र यात मोठा कांदाच भाव घेऊन गेला. तर, सर्वसामान्य शेतकऱ्यांवर २ ते ३ रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पंचगंगा, जिंदाल, एलोरा या तीन जातीच्या पावसाळी कांद्याची प्रामुख्याने लागवड होते.
दोन दिवसापूर्वी पंढरपूर बाजारात कांद्याची मोठी अवाक झाल्याने दर पडले होते. आज कमी आवक होऊनही दरात फार सुधारणा न झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. आज जुन्या उन्हाळी म्हणजे फुरसुंगी कांद्याला मात्र ५०० रुपयांपासून ते ३२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला असला तरी उन्हाळा कांदा फारच थोडा असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळ्यात पावसाळी कांद्याने पाणी आणले आहे.
पंढरपूरमधून तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथून आठवड्याला ८ ते १० ट्रक कांदा विक्रीसाठी जातो. मात्र, सध्या मालाची विक्रीच होत नसल्याने पाठवलेल्या गाड्याची भाडीही निघणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हा ओला कांदा एक दिवसापेक्षाही जास्त टिकत नसून बाहेर पाठवताना ट्रकमध्येच त्याला कोंब येतात. तर काही कांद्याला पाणी सुटते. त्यामुळेकमी कांदा खरेदी करीत असल्याचे व्यापारी राजेंद्र कदम यांनी सांगितले.
                                    
                                
                                
                              
