मुंबई :देशात करोनाचा शिरकाव होऊन आठ महिने झाले आहेत. मात्र अद्यापही संशोधक आणि तज्ञ विषाणूंचा फैलाव रोखण्यात यश मिळू शकलेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे बदलत्या वातावरणात संसर्ग वाढणार की कमी होणार हा एक चिंतेचा विषय आहे. कारण पावसाळा संपत आला असून आता हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हिवाळ्यात करोनाचा कहर वाढणार की कमी होणार ? याची चिंता सर्वांना सतावत आहे.
दरम्यान हिवाळ्यात करोनाचा कहर वाढण्याची शक्यता असून केंद्र सरकार त्यादृष्टीने तयारी करत आहे. “पुढील दोन ते तीन महिने खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहे. अनेक सण येत असले तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करावंच लागेल,” असं नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉक्टर विनोद पॉल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे.
“श्वसनामार्गे शरिरात प्रवेश करणारे विषाणू खूप धोकादायक असून, कमीत कमी लोकांना संसर्ग व्हावा यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत,” असं डॉक्टर विनोद पॉल यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, “हिवाळा विषाणू आणि संसर्गासाठी प्रजनन काळ असतो. जगभरात करोनाची दुसरी लाट आली आहे हे आपण विसरता कामा नये. जसजसा हिवाळा जवळ येत आहे आम्हीदेखील करोना विषाणूंच्या इतर गंभीर प्रकारांचे शोध घेत आहोत”.
“हीच ती वेळ आहे कारण हिवाळ्यात श्वसनामार्ग होणाऱ्या संसर्गात वाढ होते. करोनाच्या बाबतीत ही धोक्याची घंटा आहे,” असं डॉक्टर विनोद पॉल यांनी म्हटलं आहे. याआधी हंगमी बदल करोनाचा फैलाव होण्यासाठी मदतशीर ठरत असल्याचं समोर आलं आहे. तज्ञांनी हिवाळ्यात जास्त काळजी घेतली जावी असं आवाहन लोकांनी केलं आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्या ६१,४५,२९१ झाली आहे. त्यातील ५१,०१,३९७ रुग्ण करोनामुक्त झाले असून, हे प्रमाण ८३.०१ टक्के आहे. देशभरात ९,४७,५६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.