Advertisement

धारुरच्या तरुणाचा कर्नाटकात दुर्दैवी मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 24/11/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर–धारूर शहरातील संभाजीनगर (वडारवाडी) या भागात राहणारे ऊसतोड मजूर अच्युत पवार यांचा तरुण मुलगा राहुल पवार यांचा कर्नाटक राज्यात वडीलांना मदत करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की धारूर शहरातील वडारवाडा या भागात राहणारे अच्युत पवार हे ऊस तोडणीचे काम करतात. त्यांचा तरुण मुलगा राहुल पवार (वय 22) हा देखील ऊसतोडणीसाठी वडिलांना मदत करण्यासाठी कर्नाटकातील कारखान्यावर गेला होता. तो ट्रॅक्टर मधून पेटी काढत असताना ती पेटी डोक्यावर घेतलेली होती.

 

पेटी वजनदार असल्याने डोक्यावर घेऊन जात असताना चक्कर आली. यातच वजनदार पेटी मानेवर पडली. त्याच्यावर दवाखान्यामध्ये उपचार सुरू होते. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धारुर तालुक्यातील अनेक लोक हाताला काम नसल्यामुळे ऊस तोडणीसाठी इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. यात अशा स्वरुपाच्या घटना समोर येत आहेत.

दिवसेंदिवस ऊसतोड मजुरांचा व त्यांच्या नातलगांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलीचा विहिरीवर पाणी आणताना मृत्यू झाला होता. तर गांजपूर येथील एका ऊसतोड मजुरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. त्यातच आता राहुल पवार (वय 22 वर्ष) या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत गरीब कुटूंबावर दुख कोसळल्याने धारूर संभाजीनगर वडारवाडा व तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement