किल्लेधारूर/माजलगाव दि.20 नोव्हेंबर – आज (दि.20) धारुर शहरात हजरत टिपू सुल्तान जयंती उत्सव समिती आयोजित लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकाच दिवसात तब्बल 548 जणांनी लस घेतली आहे. तर माजलगाव शहरात आरोग्य प्रशासनाकडून ‘नो वॕक्सिन नो इंट्री’ मोहिम राबवण्यात आली.
कोरोनाशी लढण्यासाठी कोरेाना प्रतिबंधक लस हे प्रभावी अस्त्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रशासन लसीकरणासाठी विविध पर्याय वापरत आहे. शनिवारी माजलगाव शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची तपासणी करुन लस टोचून घेतलेली असेल तरच माजलगावात एंट्री अनथा माघारी अशी मोहिम जिल्हा रुग्णालय प्रशासनाने राबविली.
वाहनधारकाच्या नावानुसार त्याची कोव्हिन अॅपवर नोंद असेल तरच त्याला शहरात येऊ दिले गेले. या मोहिमेत दस्तूरखुद जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे व माजलगावच्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांनी सहभाग घेतला.
शहीद टिपू सुलतान जयंती निमित्त कोविड लसीकरण शिबिरात विक्रमी लसीकरण
किल्लेधारूर शहरात आज दि. 20 शनिवार रोजी ह. टिपु सुलतान जयंती उत्सव समीती किल्ले धारूरच्या वतीने टिपु सुल्तान जयंती निमित्त नगर परिषदेसमोर बाजार तळ येथे कोविड लसीकरण शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धारूर नगरीचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ, ॲड. मोहन भोसले, ज्ञानेश्वर शिंदे तसेच या कार्यक्रमला टिपु सुलतान जयंती उत्सव समीतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या शिबिरात आजपर्यंत सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली. एकुण 548 जणांनी लसीकरण केल्याने टिपू सुल्तान जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानले. यात कोव्हक्सिन 431 तर कोविशिल्ड लसीचे 117 डोस देण्यात आले. येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.चेतन आदमाने यांनी आजचे लसीकरण सर्वाधिक असल्याचे सांगत शहरात दोन्ही डोस मिळून 23 हजाराचा टप्पा पार झाल्याची माहिती दिली.