बीड 13 नोव्हेंबर – राज्याला हादरवून सोडणारी अमानुषतेचा कळस गाठणारी आणखी एक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, एकाच दिवसांत जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सदरील घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांच्या काळात तब्बल 400 जणांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला होता. लग्नानंतर सासरी नवरा सांभाळत नसल्याने पीडित मुलगी आपल्या वडिलांकडे राहायला गेली.
पण वडिलांनीही तिला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे असहाय्य आणि निराधार झालेली ही अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली. एकट्या मुलीला पाहून गेल्या सहा महिन्यात तब्बल 400 जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे.
बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान या घटनेला वाचा फुटली. याप्रकरणी बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे बालविवाह लावून दिल्याच्या कारणावरून वडिलांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अत्याचार करणाऱ्या तीन संशयित आरोपींवरही गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीचा पुरवणी जबाब नोंदवला जाणार असून अत्याचार करणाऱ्या अन्य आरोपींची नावं यामध्ये उघड होणार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दोन अल्पवयीन मुलींची आत्महत्या.
बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच दिवशी दोन मुलींनी आत्महत्या केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील नेकनूर आणि केज तालुक्यातील मस्साजोग या ठिकाणी दोन घटना घडल्या आहेत. नेकनूरमध्ये एका 16 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर केज तालुक्यातील मस्साजोग येथे दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.