Advertisement

नांदेड, मालेगाव, अमरावतील मोर्चाला हिंसक वळण

प्रजापत्र | Friday, 12/11/2021
बातमी शेअर करा

औरंगाबाद दि.12 नोव्हेंबर – उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात झालेल्या हिंसेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रात  विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांकडून बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी मोर्चे, आंदोलन देखील करण्यात आले. नांदेड,मालेगाव व अमरावतील मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे.

 

बांग्लादेशात  नवरात्रामध्ये दुर्गा मंडपाची मुस्लीम जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद त्रिपुरात  उमटले. उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी एका मशीदीची व आसपासच्या दुकानांची तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्यानंतर याचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला. त्रिपुरातील घटनेचे पडसाद आता देश आणि महाराष्ट्रात उमटल्याचे पहायला मिळत आहे.

 

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलनासह बंद पुकारण्यात आला होता. याला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. मालेगावात संतप्त आंदोलकांनी पोलिसांवरच  दगडफेक केल्याची माहिती आहे. नांदेडमध्ये देखील संतप्त जमावाने रस्त्यावरील चारचाकी, दुचाकी वाहनांची जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. यात काही पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत.

 

दरम्यान, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी आंदोलकांना शांततेने आपापल्या घरी जाण्याचे आवाहन केले. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, दगडफेक करू नका, आपापल्या घरी जा, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत होते.

 

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात देखील मुस्लिम संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. अमरावती  जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा हजार आंदोलकांनी मोर्चा काढला, पण हा मोर्चा अचानक आक्रमक झाला आणि त्यांनी दगडफेक आणि वाहनाची तोडफोड सुरू केली. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला असून अमरावतीत सध्या प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या घटनेचे भाजपकडून निषेध नोंदवत उद्या अमरावती बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

 

पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. 30 आॅक्टोबर रोजी उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील एक मशीद हिंदुत्ववादी संघटनांनी पाडल्याचा आरोप मुस्लिम संघटनांना केला होता. एवढेच नाही तर मशीद परिसरात असलेल्या मुस्लिमांच्या काही दुकाना देखील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप आणि त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

Advertisement

Advertisement