Advertisement

धारुरच्या पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन

प्रजापत्र | Thursday, 11/11/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.11 नोव्हेंबर – राज्यभर पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांचा  संप धारुरमध्येही सुरु आहे. मात्र येथील 5 संपकऱ्यांवर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून आज कर्मचाऱ्यांचे सामुहिक मुंडण आंदोलन होणार आहे. कोणतीही कारवाई केली तरी आमचे आंदोलन सुरुच राहील अशी भूमिका संपकऱ्यांनी घेतली आहे.

 

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळाने कारवाईत वाढ केली असून बुधवारी राज्यात 542 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 918 झाली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई बुधवारी आणखी तीव्र करण्यात आली असून 64 आगारांतील 542 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. यात धारुर आगारातील 4 वाहक व एक चालक अशा 5 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी कर्मचारी यांचे निलंबन करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. मंगळवारी 376 कर्मचारी याचे तर बुधवारी 20 जिल्ह्यातील 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यात बीड (Beed) जिल्ह्यातील 22, उस्मानाबाद 36, नागपूर 46, वर्धा 10, भंडारा 30, चंद्रपूर 15, अकोला 20, बुलढाणा 34, यवतमाळ 20, अमरावती 20, औरंगाबाद 10, परभणी 25, नाशिक 40, अहमदनगर 20, जळगाव 28, पुणे 26, सांगली 58, सातारा 2, सोलापूर 35 तर रायगड जिल्ह्यातील 19 कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले.

 

धारुरमध्ये आज कर्मचाऱ्यांचे मुंडण आंदोलन

ज्या प्रकारे शासनाने संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केलेली आहे. यात बुधवारी धारुर आगारातील  5 तर जिल्ह्यातील एकुण चार आगारातील 22 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. याचा निषेध म्हणून धारुर आगारातील कर्मचाऱ्यांनी सामुहिक मुंडण आंदोलनाचे आयोजन आज दि.11 गुरुवारी केले आहे.

Advertisement

Advertisement