केज दि.29 - मोटारसायकल चालकाने हयगईने व निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून पायी चालणाऱ्या व्यक्तीस पाठीमागून जोराची धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील होळ येथे काही दिवसापुर्वी घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचाउपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मोटरसायकल चालकावर युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
होळ येथील पुलाजवळ मोटरसायकल चालक साहेबराव हनुमान चव्हाण यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल (एम. एच. ४४ जे ९४९०) भरधाव वेगात, हयगईने व निष्काळजीपणे चालवून पायी चालणारे बंकटी किसन तारडे (रा. होळ) यांना पाठीमागून जोरात धडक दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यात गंभीर जखमी झाल्याने बंकटी तारडे यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तारडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत बंकटी किसन तारडे यांचा बंधु मधुकर किसन तारडे यांच्या एम. एल. सी. जबाबावरून मोटारसायकल चालक साहेबराव हनुमंत चव्हाण ( रा पळसखेडा ता. केज) यांच्या विरुद्ध युसूफवडगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार मुंडे हे करत आहेत.