Advertisement

धक्कादायक...एसटीला गळफास घेवून चालकाची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 29/10/2021
बातमी शेअर करा

शेवगाव- राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप मिटला असताना आज सकाळी शेवगावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बस चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली.दरम्यान संप मिटला नाही, सुरूच राहणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत असून बीड जिल्ह्यात मात्र बस सेवा सुरळीत असल्याचे चित्र आहे.

 

दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते शेवगाव आगारात चालक म्हणून येथील कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे आज सकाळी (दि.29) उघडकीस आले. 

घटनेची माहिती मिळताच आगाराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

दरम्यान, काल राज्यातील सर्वच आगारातील कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या पगारीसह इतर मागण्यासाठी संपावर होते. सांयकाळी कर्मचाऱ्यांच्या वतीने संयुक्त कृती समितीच्या मांडलेल्या मागण्या मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. मात्र यानंतर शेवगावमध्ये घडलेल्या या बस चालकाच्या आत्महत्येमुळे पुन्हा कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेत येत आहे.

संप मिटला...

दिलीप हरिभाऊ काकडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी समोर येत असली तरी कर्मचाऱ्यांचा संप काल रात्रीच मिटला असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे.आज सकाळपासून बीड जिल्ह्यातील बस सेवा सुरळीत सुरु असून प्रवाशांचाही उत्सपूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

Advertisement

Advertisement