Advertisement

राज्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा

प्रजापत्र | Friday, 18/09/2020
बातमी शेअर करा

बीडः कोरोनावर उपचारासाठी महत्वाची भूमिका बजावत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजक्शनचा राज्यभरात प्रचंड तुटवडा जाणवत आहे. विशेषतः खाजगी दवाखान्यांमध्ये आठ दिवस अगोदर पैसे भरुनही रुग्णालयांनाच सदर इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याचे वैद्यकीय व्यावसायीकांचे म्हणणे आहे.
राज्यात कोरोना संसर्ग वाढत असून रुग्णालयांमध्ये खाटा कमी पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी असतानाच आता कोरोनावर परिणामकारक ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होत आहे. आज घडीला राज्याची सुमारे ७० हजार इंजेक्शनची मागणी आहे, मात्र या औषधाचे उत्पादन करणाऱ्या सिप्लासह चारही कंपन्या मागणी पुर्ण करण्यात कमी पडत आहेत. देशभरातच रेमडेसिव्हीरची मागणी वाढलेली आहे, मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.
खाजगी कोव्हिड रुग्णालयांकडून रेमडेसिव्हीरची मागणी वाढली आहे. त्यासाठी अनेक रुग्णालये आठ दिवस अगोदर पैसे भरुन मागणी नोंदवत आहेत, मात्र ५०० ची मागणी नोंदवली आणि पैसे भरले तरी एकावेळी ३६-४८ इतकेच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. एकाच वेळी चारही कंपन्यांकडे मागणी नोंदवून सध्या इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे रुग्णालय व्यवस्थापन म्हणत आहे.
राज्याच्या औषध प्रशासन विभागानेच आता पुरवठा नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement