किल्लेधारूर दि.20 अॉक्टोंबर - धारुर शहराचे सुपूत्र डॉ. जमिल जरगर यांचे अल्पशः आजाराने सौदी अरेबिया येथे उपचार सुरु असताना अवघ्या 38 व्या वर्षी पहाटे 3 वाजता निधन झाले. ते विद्वान तरुण म्हणून ओळखले जात.
डॉ. जमिल गुलाब जरगर यांचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. यानंतर रसायनशास्त्रात एमएससी पदवीवोत्तर शिक्षण घेत विजापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम केले. येथे डॉक्टरेट मिळवून पाच वर्षापूर्वी अल-बहा विद्यापिठ सौदी अरेबिया येथे प्रोफेसर म्हणून रुजू झाले होते. त्यांनी पवित्र धर्मग्रंथ दिव्य कुराणचे जगदविख्यात भाषांतरकार म्हणून नावलौकिक मिळवला होता.
दहा दिवसांपुर्वी चक्कर आल्याच्या क्षुल्लक कारणावरुन त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातच कोमात गेल्यानंतर आज दि.20 अॉक्टोंबर रोजी पहाटे 3 वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती मिल्लिया उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वाजेद जरगर यांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सध्या ते पत्नीसोबत सौदी अरेबियात होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच धारुर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.q