औरंगाबाद - मराठवाड्यात मागील तीन वर्षांपासून सुपीक जमीन अतिवृष्टीमुळे वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा १५० टक्के पाऊस झाल्याने अंदाजे ७ हजार हेक्टर जमीन वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तीन वर्षांत सुमारे १० हजार हेक्टर जमीन अतिपावसामुळे खरडून गेली. २०२० साली झालेल्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत सुमारे ६ हजार ८२१ हेक्टर जमीन वाहून गेली. यामध्ये सर्वाधिक जमीन उस्मानाबाद, जालना जिल्ह्यातील होती. औरंगाबाद जिल्ह्यातील ५०, जालन्यातील २५०० हेक्टर, नांदेडमधील ६६, लातूरमधील १ हजार तर उस्मानाबादमधील ३ हजार १६५ हेक्टर जमीन वाहून गेली. यंदाही अशीच अवस्था झाली असून, पंचनाम्याअंती किती जमीन वाहून गेली, हे स्पष्ट होईल.
२०१९ च्या पावसाळ्यात विभागातील सुमारे ३ हजार हेक्टर जमीन वाहून गेली होती. ३ इंचांपेक्षा अधिक जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांसह मोठे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत शासनाकडे प्रस्तावही देण्यात आले होते. ३७ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर नुकसानभरपाईचे प्रस्ताव दिले. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनी पूर्ववत झाल्या नाहीत. २०१८ सालीदेखील मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील जमीन वाहून गेली. १ हजार हेक्टरच्या आसपास जमीन वाहून गेल्याचे पंचनामे प्रशासनाने केले होते. जमीन खरडण्याचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्र बदलल्यामुळेही शेतजमीन वाहून गेली. तीन वर्षांत सुमारे २ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले.
का वाहून जाते जमीन ?
मराठवाड्यात जमीन वाहून जाण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण वृक्षतोड आहे. जमिनीचे उतार, सपाटीकरण नसल्यामुळेदेखील नुकसान होत आहे. सुपीक जमीन अतिपावसामुळे लवकर वाहून जाते. त्यासाठी पाण्याचा वेग थोपविणारी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. मागील तीन वर्षांपासून अतिपावसामुळे जमिनीचे नुकसान होत आहे, असे जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी) येथील मृदा शास्त्रज्ञांनी सांगितले.