केज दि.२८ - तालुक्यातील हनुमान पिंपरी येथे चोरीच्या संशयावरून तीन अनोळखी इसमाना जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. मारहाणी नंतर मयत व जखमी यांना ट्रॅक्टरने गावापासून दूर नेऊन सोडले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटना दि.28 रोजी 12.30 च्या दरम्यान घडली.
मयताचे सासरे अशोक भिमराव शिंदे रा कोठाळवाडी हनुमान वस्ती ता. कळंब जि उस्मानाबाद याने माहिती दिली की, त्याचा जावई शिवाजी नामदेव काळे, मुलगा दीपक अशोक शिंदे व आकाश बापू काळे हे आरणगाव कडून काळेगाव हनुमंत पिंप्री मार्गे त्यांच्यामोटार सायकल क्र एमएच २५/ए-२२५५ वरून गावाकडे जात असताना रात्री १२:०० च्या दरम्यान आरणगाव च्या पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी पुलावरून गाडी घातली होती. गाडीत पाणी गेल्यामुळे गाडी बंद पडली. मात्र प्रसंगावधान राखून ते गाडीवरून खाली उतरले व त्यांनी गाडी ढकलीत चालले असताना १२:३० च्या दरम्यान हनुमंत पिंप्री येथे आले असताना चोर समजून जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात शिवाजी नामदेव काळे याचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला तर दीपक अशोक शिंदे आणि आकाश बापू काळे हे जखमी झाले. शिवाजी नामदेव काळे याचा मृत्यू होताच जमावाने त्यांना एका ट्रॅक्टरने बोरगाव चौका रस्त्याच्या कडेला नेऊन टाकून दिले. नंतर जखमी दीपक शिंदे व आकाश काळे हे भीतीने गावाकडे पायी जायला निघाले. मात्र त्यांचा सकाळ पर्यंत तपास लागला नसल्याची माहिती आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, बिट जमादार अमोल गायकवाड, अशोक गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मयताचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवण्यात आले. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.