Advertisement

केज तालुक्यात पावसाचा हाहाकार

प्रजापत्र | Tuesday, 28/09/2021
बातमी शेअर करा

 

केज दि.28 -  सतत कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील सर्वच तलाव भरल्याने नदी नाल्यांना पूर आला असून सदरील पाणी अनेक गावांत घुसले आहे. घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.तर मांजरा धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडावे लागल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे.
            तालुक्यातील उंदरी नदीचे पाणी नायगाव मध्ये घुसले असून तट बोरगाव शिवार पुर्ण पाण्यात गेला आहे.
सोनिजवळा पाझर तलावाचे पाणी घरात घुसले आहे.तर इस्थळ जि.प. शाळेत पाणी आले आहे.
 सोमनाथ बोरगावचा संपर्क तुटला आहे तर होळणा नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. आपेगाव दवाखान्या पर्यंत मांजरा नदीचे पाणी आले असून
गांजी शे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने संपर्क तुटला. भाटुंबा गावात पाणी शिरले असून लोक भयभीत झाले आहेत.
            मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून खालच्या भागात संकट निर्माण झाले आहे. तर केज शहरातील पिसाटी पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरता केलेला रस्ता वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे कित्येक प्रवाशांना रात्रभर केजमध्येच थांबावे लागले असून वाहतूक कांही प्रमाणात केज माळेगाव मार्गे अंबाजोगाई कडून वळवण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement