Advertisement

आजारी बाळाला रुग्णालयात नेणाऱ्या वाहनाचा अपघात

प्रजापत्र | Tuesday, 14/09/2021
बातमी शेअर करा

 

बीड : दोन वर्षांचा चिमुकला रात्री तापेने फणफणला. त्यामुळे त्याला घेऊन आई, वडील चुलता जीपमधून बीडकडे निघाले. मात्र, वाटेत त्यांच्या जीपला मालवाहू जीपने समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बाळाची आई आणि चुलता जागीच ठार झाले तर बाळासह त्याचे वडील बालंबाल बचावले. बीड-परळी मार्गावरील जरूड फाट्यावर १४ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 

रवि नागोराव मिटकर (वय २६), सोनाली माधव मिटकर (वय ३०) अशी मयत दीर-भावजयीची नावे आहेत. चालक विशाल अर्जुन मिटकर (वय २७) हा जखमी असून गौरव माधव मिटकर (वय २) आणि माधव नागोराव मिटकर (वय ३५) हे थोडक्यात वाचले. घाटसावळी तांडा (ता.बीड) येथील रहिवासी असलेल्या मिटकर कुटुंबातील गौरवला रात्री ताप आला. त्यामुळे पहाटे ३ वाजता त्याला घेऊन कुटुंबीय बीडकडे जीपमधून (एमएच ०६ एएस ०४६७) बीडला निघाले होते तर भूम (जि. उस्मानाबाद) येथून परळीकडे भाजीपाला घेऊन मालवाहू जीप (एमएच २५ एजे- ३४०३) जात होती. बीड- परळी मार्गावर जरूड फाट्यानजीक मालवाहू जीपचालकाचा ताबा सुटला आणि समोरासमोर जोराची धडक झाली.

यानंतर जीप शंभर दीडशे मीटरवर जाऊन उलटली. यात रवि मिटकर व सोनाली मिटकर हे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक अर्जुन मिटकर हा जखमी झाला. गौरव आणि त्याचे वडील माधव हे अपघातानंतर जीपमधून बाहेर झेपावले. त्यामुळे ते सुरक्षित आहेत. अपघातात जीपचा अक्षरशः चुराडा झाला असून मालवाहू जीपचे देखील नुकसान झाले. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

स्थानिकांचे मदतकार्य

दोन जीपची समोरसमोर धडक झाल्यावर मोठा आवाज झाला. या आवाजाने किशोर काकडे व जालिंदर काकडे धावत आले. त्यानंतर दादासाहेब लांडे यांनी देखील तेथे पोहोचून मदतकार्य केले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मालवाहू जीपचालकास त्यांनी पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Advertisement

Advertisement