Advertisement

डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक

प्रजापत्र | Sunday, 12/09/2021
बातमी शेअर करा

केज दि.१२ – मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे राहिलेले आहे. यामध्ये निरक्षरच नाहीतर चांगले सुशिक्षित लोकही बळी पडत आहेत. असाच एक गंडा केज शहरातील डॉक्टरला घातला असून २१ हजाराचा फटका बसला आहे.
शहरातील कानडी रोडवर असलेल्या डॉक्टर प्रवीण किशनराव पैठणकर यांनी दि.२१ जून २०२१ रोजी दुपारी १.५५ वाजता पाईप दुकानदाराला पाठवलेले पैसे न गेल्याने फोन पे हेल्पलाईनला फोन केला. त्यानंतर लागलीच ९८८३७५३३०५ या मोबाईल नंबरवरून पैठणकर यांच्या मोबाईल नंबरवर फोन आला व फोनवरील अनोळखी व्यक्तीने AnyDesk नावाचे ऍप इंस्टॉल करून सर्व परमिशन ला मान्यता द्या म्हणून सांगितले. त्यानुसार पैठणकर यांनी यांनी सदर ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आलेल्या सर्व परमीशन्सला मान्यता दिल्या. मात्र त्यानंतर त्यांच्या खात्यावरील २१,४५५/- रुपये डेबीट झाले.
दरम्यान डॉ.प्रवीण पैठणकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी बीड सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement