Advertisement

अनेक ठिकाणी शेतात पाणी,हातचे पीक पूर्ण जाण्याची भीती;राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - ना. मुंडे

प्रजापत्र | Monday, 06/09/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड दि.६ (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा सण असलेल्या बैल पोळ्याच्या दिवशी शेतातील पिके पाण्यात आहेत, हातचे पीक पूर्ण जाईल की काय अशी भीती वाटत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसात सर्वत्र सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात जारी केलेल्या आदेशांना अनुसरूनच विमा कंपनी, महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करावेत असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा प्रशासनास दिले आहेत. 

 

मागील आठवड्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आष्टी, गेवराई, बीड व वडवणी तालुक्यांचा दौरा करून पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले होते. आता पुन्हा जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाने झालेले नुकसान आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. 

याचाच विचार करून मागील आठवड्यात जारी केलेल्या आदेशांना अनुसरून तात्काळ संयुक्त पंचनामे करावेत. नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये तसेच सुष्पष्ट पंचनामे व्हावेत असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. 

बैल पोळा व त्यातच अस्मानी संकटाने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या कठीण काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये; नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला भरपाई मिळेल यासाठी शासन व विमा कम्पनी स्तरावर प्रयत्न केले जातील, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement