Advertisement

सहाव्या महिन्यातच जन्मलेल्या बालिकेला डॉक्टरांच्या अथक परिश्रमातून जीवदान  

प्रजापत्र | Friday, 13/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड दि.१३ (प्रतिनिधी)-तिचा जन्म झाला सहाव्या महिन्यात, २४ आठवड्याचे वय , शरीरातील कोणत्याच अवयवाची वाढ झालेली नाही, ना ह्रदयाचा पूर्ण विकास झालेला ना फुफुसाचा. जन्मतः वजन अवघे ६५० ग्राम . या बालिकेला जगवायचे कसे हा प्रश्न तिच्या आईवडिलांसमोर होता. पुण्य मुंबईच्या रुग्णालयात घेऊन जायचे तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील तशी नाही. अशा परिस्थितीत केजचे बालरोग तज्ञ डॉ . दिनकर राऊत त्या कुटुंबाच्या मदतीला धावून आले. आणि तब्बल १९ दिवस क्षणाक्षणाला काळजी घेत त्यांनी या बालिकेला जीवदान सदिले आहे. ती बालिका आता केवळ जगलीच नाही तर तिच्या मेंदूची वाढ देखील चांगली झाली आहे. केज सारख्या तालुक्याच्या ठिकाणावर , अत्यंत कमी संसाधनांमध्ये डॉ. राऊत आणि त्यांच्या चमूने केलेली ही कामगिरी वैद्यक शास्त्रातील एक विक्रम ठरणार आहे.

 

 

वय पूर्ण होण्या अगोदर जन्मलेले बालक हे वैद्यक शास्त्रासमोर आव्हानच असते . त्यातही ७ किंवा ८ महिने पूर्ण झाले असतील तर समस्या थोड्या कमी होतात, मात्र अंगदुजी २४ आठवड्यातच ( ६ महिने ) जन्मलेले बालक म्हणजे वैद्यक क्षेत्राला मोठेच आव्हान. त्यातही त्या बालकावर तालुका स्तरावरच्या दवाखान्यात उपचार करायचे असतील तर प्रयत्नांचा आणि वैद्यक शास्त्रातील ज्ञानाचाही कस लागणार . मात्र हे आव्हान देखील पेलता येते हे दाखवून दिले ते केजच्या बालरोग तज्ञ डॉ. दिनकर राऊत यांनी. त्या बालिकेवर उपचार करणे म्हणजे एक दिव्यच होते, नसा सापडत नाहीत म्हणून सेंट्रल लाईन टाकण्याचे कठीण काम असेल किंवा पूर्ण वाढ न झालेल्या फुफुसाच्या क्षमतेप्रमाणे व्हेन्टिलेटरची उपाययोजना करणे असेल, त्या बालिकेचा रक्तदाब, ह्रदयाचे कार्य सार्‍यावर लक्ष ठेवणे आणि गरजेनुसार बदलणारे उपचारपद्धती वापरणे, कोणाचा सल्ला घ्यावा तर असे प्रकार काही नेहमी नेहमी होत नसतात. कधी पीसीव्ही द्यायचे तर कधी आणखी काही. तब्बल १९ दिवस डॉ. दिनकर राऊत आणि त्यांची पूर्ण टीम रात्रीचा दिवस करत त्या बालिकेच्या संघर्षात साथ देत होती . हा संघर्ष केवळ त्या बालिकेचा नव्हता, तर हा संघर्ष सार्‍या टीमचा वैद्यक शास्त्राशी होता. अपुर्‍या संसाधनांमध्ये देखील अवघडत अवघड  उपचार करता येतात हे दाखवीत त्या बालिकेला केवळ जीवदान नव्हे तर संपूर्णतः सक्षम आयुष्य देणे, तिला कोणत्याही मेंदू किंवा ह्रदयाच्या व्याधी भविष्यात निर्माण होणार नाहीत असे आयुष्य देणे हे मोठे आव्हान , मात्र डॉ. राऊत यांच्या टीमने ते पेलले आणि सहाव्या महिन्यात जन्मलेली ती बालिका आता मोकळा श्वास घेत आहे.

 

 

विशेष म्हणजे हे सारे करताना महागड्या उपचारासाठी पैशांचा प्रश्न होताच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून यासाठी मंजूर झाले अवघे ६५ हजार,वरचा सुमारे ५० हजाराचा खर्च डॉ. राऊत यांनी स्वतः केला हे देखील आवर्जून उल्लेख करावे असे. ज्यावेळी जादा बिले उकळली म्हणून डॉक्टरांकडे वेगळ्या नजरेने पहिले जाते, त्यावेळी एका २४ आठवड्यात जन्मलेल्या बालिकेला वाचविण्यासाठी वैद्यक क्षेत्रातील ज्ञान, संयम,चिकाटीचा नव्हे तर अगदी स्वतःचा खिसा देखील पणाला लावण्याची वृत्ती हीच आपल्या वैद्यक क्षेत्राची आश्वासकता आहे.

 

 

Advertisement

Advertisement