Advertisement

घाबरू नका, दोन महिन्यापूर्वी झाली होती 'त्या' रुग्णाला डेल्टाची लागण

प्रजापत्र | Tuesday, 10/08/2021
बातमी शेअर करा

 

 बीड :  जगभरात धुमाकूळ घातलेल्या डेल्टा व्हेरिएंटचा बीड जिल्ह्यातही शिरकाव झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ माजली होती, मात्र आता त्यासंदर्भाने दिलासादायक माहिती समोर आली असून ज्या रुग्णाला डेल्टाची लागण झाल्याचे समोर आले होते, त्याच्या निकटच्या कोणालाही कोरोनाची लागण झाली नव्हती हे आता तपासणीत समोर आले आहे. सदर रुग्णावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार झाले होते, त्यांना सुटी झाल्यानंतर किडनीच्या आजाराने त्यांचा जुलै महिन्यात राहत्या घरात मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरच्या काळात त्यांच्या घराच्या परिसरात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे डेल्टाचा प्रसार या भागात झाला नसकल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

 

जीनोम सिक्वेन्सिंग करताना डेल्टा व्हेरिएंटचा एक रुग्ण बीड जिल्ह्यातील असल्याचे सोमवारी समोर आले होते. राज्य शासनाने तसा संदेश बीडच्या प्रशासनाला पाठविला होता. त्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच आरोग्य विभागात खळबळ माजली होती. सकाळी सदर रुग्ण हा बीड शहरातील असल्याचे स्पष्ट  झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने सदर रुग्णाच्या राहत्या घराच्या परिसराला भेट दिली. त्यावेळी सदर रुग्णाचा किडनीच्या आजाराने जुलै महिन्यात राहत्या घरी मृत्यू झाल्याचे समोर आले. सदर रुग्णाला (वय ७३ ) कोरोनाची लागण झाल्याचे ५ जून ला समोर आले होते. त्यांच्यावर २९ जून पर्यंत जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. मात्र त्यांना नियमित डायलिसिसचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर ५ जुलैला किडनीच्या आजाराने सदर रुग्णाचा राहत्या घरी मृत्यू झाला.
सदर रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतरच आरोग्य विभागाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केली होती, त्यावेळी सदर रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले नव्हते. तसेच जर परिसरात डेल्टाचा प्रसार झाला असता तर २ महिन्याच्या काळात त्याचे परिणाम बीड शहरावर मोठ्याप्रमाणावर दिसले असते, तसेच त्या परिसरात देखील उद्रेक झाला असता. मात्र तसे चित्र नाही. आजही बीड तालुक्यातून रोज हजाराच्या घरात तपासण्या होत असतानाही तालुक्याचा पॉझिटिव्हिटी दर ५ % च्या आतच आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सध्या तरी डेल्टाचा धोका नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे.
 

 

 

परिसराचे होणार सर्व्हेक्षण
ज्या परिसरात रुग्णाच्या नमुन्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळला होता , त्या परिसराला मंगळवारी आरोग्य विभागाच्या पथकाने भेट दिली आहे. आता या परिसरातील ३४५ कुटुंबांचा सर्व्हे होणार आहे. यात कोणाला फ्लूसदृश लक्षणे असतील तर त्यांच्या तपासण्या केल्या जातील आणि त्यात कोणी पॉझिटिव्ह आढळते तर त्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल. मात्र आजतरी घाबरण्यासारखे चित्र नाही.
डॉ. नरेश कासट , तालुका आरोग्य अधिकारी, बीड

 

Advertisement

Advertisement