परळी : बायको कीर्तन ऐकायला गेली म्हणून संतप्त झालेल्या पतीने भर कीर्तनात दगडफेक व तलवारबाजी करून गोंधळ घातल्याचा प्रकार परळी तालुक्यातील मालेवाडी येथे घडला. तसेच नवऱ्याने पत्नीला मारहाणही केली. यावेळी मध्यस्थी करणारे अन्य चार जणही जखमी झाले. याप्रकरणी पीडित महिलेने पती विरुद्ध फिर्याद दाखल केली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळीपासून जवळच असलेल्या मालेवाडी येथे हनुमानाच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम होता. व्याकरणाचार्य हभप अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन सुरू होते. भक्त कीर्तनात तल्लीन झाले होते. याच दरम्यान आरोपी माणिक कुंडलिक बदने (रा. मालेवाडी) हा हातात तलवार घेऊन आला. भक्तांमध्ये बसलेल्या पत्नीजवळ जात 'तू कोणाला विचारून किर्तनाला आलीस?', असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली.
कीर्तनाला आलेल्यांनी पती-पत्नीचे भांडण सोडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने संतप्त होत दगडफेक केली, तसचे हातातील शस्त्र फिरवू लागला. या झटापटीत सुदामा पंडीतराव आंधळे, सरपंच भुराज वैजनाथ बदने, आदिनाथ संभाजी बदने, भरत रामकिसन आंधळे यांना दुखापत झाली. या प्रकरणी पीडित पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी पती विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 324, 336, 337, 323, 504, भादंवि व 4/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जिरगे हे करीत आहेत.