परळी-तालुक्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून एका गतिमंद मुलीवर मागील वर्षभर अत्याचार करून ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद मुंजाजी रुद्रे (वय २१, रा. वडगाव, ता.जि. औरंगाबाद) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद रुद्रे हा नेहमी त्यांच्या घरी येत असे. मागील वर्षापासून लॉकडाऊनमुळे त्याचे इकडे राहणे वाढले होते. पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत मागील वर्षभरापासून गोविंदने घरात कोणी नसतानाची संधी साधून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली आणि तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. सदर फिर्यादीवरून गोविंद रुद्रे याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास फौजदार मोनाली पवार या करत आहेत.
औरंगाबादेमध्ये ठोकल्या बेड्या
गुन्हा दाखल होताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांचे एक पथक फरार आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. गोविंद औरंगाबादला असल्याची खबर मिळाल्यानंतर या पथकाने औरंगाबाद गाठून त्यास अवघ्या २४ तासात बेड्या ठोकल्या आणि अंबाजोगाईला आणले. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.