संजय मालाणी
बीड : कोरोना काळात जिल्ह्यातील जनतेला थेट मदत देण्याचा विषय असेल, किंवा ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाचा, अगदी कोरोनाकाळात प्रकर्षाने जाणवलेल्या राजकीय इच्छाशक्तीच्या कमतरतेचा , या प्रत्येकवेळी आजही 'आज गोपीनाथराव असते तर ' हे उद्गार सहज काढले जातात. गोपीनाथ मुंडेंचे अकाली निधन होऊन आता ७ वर्ष होताहेत, पण आजही जिल्ह्यात जेव्हा एखादी राजकीय, सामाजिक घडामोड घडते , त्यावेळी गोपीनाथ मुंडेंची आठवण निघाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती अजूनही कायम आहे.ती भरून निघालेली नाही.
बीड जिल्ह्याची राष्ट्रीय राजकारणात ओळख काय असा प्रश्न जेव्हा ८-१० वर्षांपूर्वी विचारला जायचा त्यावेळी एकच उत्तर असायचे ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. आणि अगदी राष्ट्रीय स्तरावर माध्यमांमध्ये देखील बीडची ओळख 'गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा ' अशीच होती. बीड जिल्ह्यातील जनतेला व्यक्तिगत पातळीवर कोणतीही अडचण आली, मग ती कौटुंबिक पातळीवरची असेल किंवा आणखी कोणती, ती 'साहेबांच्या ' कानावर घातली तर मार्ग निघेल असा विश्वास अनेकांना असायचा. त्यामागे तसेच कारण होते. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे कोणी एखादे काम घेऊन गेला आणि त्याला गोपीनाथरावांनी पत्र दिले नाही असे कधी घडले नाही.
जसे व्यक्तिगत कामाचे तसेच राजकीय घडामोडींचे. राज्याच्या राजकारणात जसे शरद पवार कायम केंद्रस्थानी राहिले तसेच गोपीनाथ मुंडे देखील. ते भलेही भाजपचे नेते असतील, मात्र त्यांचे संबंध पक्षीय बंधनात अडकणार नव्हते. सर्वच राजकीय पक्षांमध्ये गोपीनाथ मुंडे या नावावर प्रेम करणारे लोक होते तसेच कोणत्याही पक्षातील 'आपल्या' माणसाला अडचण आल्यास काय भूमिका घ्यायची हे मुंडे चांगले ओळखून होते. यामुळेच विलासराव देशमुखांपासून ते छगन भुजबळांपर्यंत सर्वानाच गोपीनाथ मुंडेंचा फायदा झाला. राज्याच्या राजकारणात बहुजनांचा एक दबावगट अशीच त्यांची ओळख होती, नव्हे महाराष्ट्राचे राजकारण बहुजन केंद्री करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
म्हणूनच आज राजकारणातून सामान्य माणूस बाजूला फेकला जात असताना, त्याच्या व्यक्तिगत अडचणींवर बोलायला कमी लोक उरले असताना, राजकारणातील दबावगटांचे बहुजनकेंद्रीपण हरवत असताना, आणि आपत्तीत काय करायचे असते, प्रशासन कामाला कसे लावायचे असते याची इच्छाशक्ती पाहायला मिळत नसल्याच्या काळात गोपीनाथ मुंडेंची आठवण प्रकर्षाने होते. बीड जिल्ह्याच्या हद्दीत आज गोपीनाथ मुंडे असते तर केवळ इंजेक्शन नाहीत, किंवा बेड मिळत नाहीत म्हणून रुग्ण मारत आहेत अशी परिस्थिती असताना ते स्वस्थ बसले असते का ? जवळच्या कार्यकर्त्यांना उपचार देता येत नाहीत इतकी हतबलता त्यांनी येऊ दिली असती का ? हा प्रश्नच आहे. म्हणूनच आज धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंसारखीच व्यक्तिगत पातळीवर काळजी करण्याची आणि सामाजिक कामाची तडफ दाखवीत असले तरी गोपीनाथ मुंडेंची पोकळी भरून निघालेली नाही, ती उणीव कायम आहेच.