Advertisement

 मुख्यमंत्री म्हणतात आणखी धोका टळला नाही, 'स्वाराती'ला मात्र कोरोना कर्मचारी कपातीची घाई  

प्रजापत्र | Tuesday, 01/06/2021
बातमी शेअर करा

बीड : कोरोनाचे आकडे कमी होत असले तरी आणखी धोका टळला नाही असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री जनतेला निर्बंधांमध्ये राहायला सांगत आहेत, मात्र त्याचवेळी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाला कोरोनासाठी घेतलेले मनुष्यबळ कमी करण्याची घाई झाली आहे. 'रुग्णसंख्या कमी होत असल्याने आता कंत्राटी मनुष्यबळ कमी करावे' असा प्रस्ताव 'स्वाराती' रुग्णालयाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

 

राज्यभरात कोरोनाचे आकडे कमी होत असले तरी अजून राज्यातील लॉकडाऊन कायम आहे. आकडे कमी होत असले तरी धोका टळलेला  नाही   असे स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहेत. तिसरी लाट केव्हाही धडक देऊ शकते म्हणून त्याची तयारी करण्याचे आदेश आहेत. मात्र एकीकडे हे सारे होत असताना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या प्रशासनाला मात्र कर्मचारी कपातीचे वेध लागले आहेत.
स्वाराती रुग्णालयात ४०० खाटांची मंजुरी आहे, मात्र आता केवळ २५९ रुग्ण असल्याचे सांगत त्यासाठी केवळ अडीचशे खाटांपुरतेच मनुष्यबळ ठेवावे आणि कंत्राटी स्वरूपात घेतलेले जास्तीचे ठरणारे मनुष्यबळ कमी करावे असा प्रस्ताव स्वारातीच्या प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

 

पहिल्या लाटेनंतर देखील जिल्ह्यात आरोग्य विभागाने कंत्राटी मनुष्यबळ तातडीने कमी केले होते. मात्र त्याचा फटका दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या काळात बसला. पहिले काही दिवस रुग्णालयांना मनुष्यबळच मिळाले नाही, परिणामी रुग्णांचे हाल झाले. आताही दुसरी लाट पुरेशी ओसरली नाही , तिसरी लाट धडकणार असल्याचे सरकारच सांगत आहे, अशावेळी यंत्रणा अधिक सक्षम करण्याऐवजी आरोग्य विभाग मनुष्यबळ कमी करणार असेल तर यातून नेमके काय साधणार आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement

Advertisement