केज- डी. २६ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी मध्यरात्री केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली असता त्या ठिकाणाहून व पुढील तपासात एकूण ६ लाख ४२हजार १२० रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आलेली आहे.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असून सर्व दारू दुकाने बंद आहेत. अशावेळी मद्याची अवैधरित्या विक्री होऊ नये, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २६ मे रोजी मध्यरात्री १.००ते ३.०० च्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील एका घरात छापा टाकला असता त्या ठिकाणावरुन देशी दारुच्या १९७ पेट्या व बीअरच्या ३ पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच आरोपी इसम गणेश बाबासाहेब रांजणकर, वय 31 वर्षे, रा. युसुफवडगाव, ता. केज, जि. बीड याला अटक करण्यात आली असून त्याचेविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या राहत्या घरातून देशी दारू टॅंगो पंच या ब्रॅंडच्या 90 मिली क्षमतेचे 167 बॉक्स, देशी दारू जी.एम.सफेद डॉक्टर 90 मिली क्षमतेचे 30 बॉक्स व किंगफिशर बीअरचे 3 बॉक्स असा दारुचा मुद्देमाल जप्त केला. सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या दारू ची किंमत रुपये 5 लाख 97 हजार 120 इतकी आहे. आरोपीने सदर दारु लातूर येथून उस्मानाबाद येथील देशी दारु दुकानाच्या नावाने खरेदी करण्यात आली असून लॉकडाऊन कालावधीत चढ्या दराने दारुची विक्री करुन नफा कमावण्याच्या उद्देश्याने साठवणूक केला होता.सदर गुन्ह्यातील पुढील तपासात सुकळी, या.केज येथील आरोपीच्या शेतातील धाब्यावरुन देशी दारू टॅंगो पंच ब्रॅंडच्या 90 मिली क्षमतेचे रु. 45 हजार किंमतीचे एकूण 15 बॉक्स अजून रिकव्हर करण्यात आले. याबाबत पुढील तपास सुरु आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मा. आयुक्त श्री कांतीलाल उमाप, मा. जिल्हाधिकारी श्री रविंद्र जगताप, विभागीय उपायुक्त औरंगाबाद श्री प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक श्री कडवे, दुय्यम निरीक्षक श्री राठोड, जवान मोरे, सांगुडे, अमीन सय्यद, सादेक अहमद व जवान-नि-वाहन चालक जारवाल यांनी केली.
तसेच एका अन्य कारवाईत सदर पथकाने मंगळवारी दुपारी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीड-लिंबागणेश रोडवर आकाश चाळक हा इसम मोटरसायकल क्र. MH23 M 123 वरुन देशी दारुची वाहतूक करतांना आढळून आल्याने त्याला अटक करुन गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या ताब्यातून देशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 96 सीलबंद बाटल्या तसेच मोटरसायकल असा एकूण रुपये 33 हजार 760 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लॉकडाऊन कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू , हातभट्टीची दारू व परराज्यातील दारूवर सातत्याने कारवाया करण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व दारु दुकाने बंद राहतील, याची दक्षता घेण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे.