Advertisement

गलथानपणाचा कळस,कोविड सेंटर मधून २२ रुग्ण गेले पळून

प्रजापत्र | Monday, 24/05/2021
बातमी शेअर करा

 शिरूर कासार – सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या कोविड केयर सेंटर मधून सात दिवसात २२ बाधित रुग्णांनी पळ काढून इतरांना या आजराचा प्रसाद दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .सात दिवसात एक दोन करून पळून जाणाऱ्या या लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे,मात्र या प्रकरणी हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित यंत्रणेवर कोणतीच कारवाई झाली नाही हे विशेष .

 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका पातळीवर शासकीय वसतिगृह तसेच इतर ठिकाणी कोविड केयर सेंटर सुरू केले आहेत .शिरूरच्या शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर आहे .सौम्य लक्षण असलेली किंवा फार त्रास नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांना या ठिकाणी ठेवून उपचार केले जातात .

 

 

१४ ते २१ मे या सात दिवसात या सेंटर मधून तब्बल 22 बाधित रुग्णांनी पळ काढल्याचे समोर आले आहे .शिरूर,बावी,आनंदगाव, घोगस पारगाव,पौंडुल,जांब,मानूर,हिवरसिंगा,झापेवाडी, दगडवाडी, नारायनवाडी या गावातील हे रुग्ण आहेत ज्यांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढला .

 

 

तब्बल सात दिवस एक एक दोन दोन रुग्ण गायब होत असताना आरोग्य विभागाची यंत्रणा झोपा काढत होती की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या डॉक्टर आणि स्टाफ वर या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे ते कश्या पद्धतीने आपली कर्तव्य पार पाडतात हे यावरून स्पष्ट झाले आहे .

 

या प्रकरणी पळ काढणाऱ्या रुग्णांवर गुन्हा दाखल झाला आहे मात्र निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे .

Advertisement

Advertisement