बीड : कोरोनाच्या बाबतीत प्रशासनाचे नियम माणूस पाहून बदलत आहेत. बीड जिल्ह्यातील एका माजी लोकप्रतिनिधीशी संबंधित व्यक्तीने पुण्यात स्वॅब दिला, स्वॅब दिलेला असताना त्याने प्रवास केला. प्रवासाच्या दोनच दिवसात त्याने कोरोनावर ‘विजय’ मिळविल्याचे केजच्या कोव्हिड सेंटरमधून नव्याने दिलेल्या स्वॅबमध्ये समोर आले. तो पर्यंत जिल्हाधिकार्यांनी त्या व्यक्तीच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीरही केला होता. मात्र आता त्याच रुग्णाला थेट होम आयसोलेशनची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना सारख्या महामारीतही प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल केज शहरात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
कोरोनाच्या महामारीत जनतेचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावत आहे. सामान्य जनता त्याचे पालनही करत आहे. पण हे सारे निर्बंध केवळ सामान्यांसाठीच असावेत असेच चित्र वारंवार दिसत असून त्याचा आणखी एक किस्सा केज शहरात घडला आहे.
बीड जिल्ह्यातील एका माजी लोकप्रतिनिधीशी संबंधित व्यक्तीने पुण्यात स्वॅब दिला. खरेतर स्वॅब दिल्यानंतर त्या व्यक्तीने प्रवास करणे अपेक्षित नव्हते आणि अशा व्यक्तीला अंतरजिल्हा प्रवासाचा पासही मिळू शकत नाही. पास मिळविण्यासाठी जो अर्ज भरावा लागतो त्यात आपल्याला कोरोना सदृश्य लक्षणे नाहीत असे घोषणापत्र द्यावे लागते. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडावे लागते. स्वॅब दिलेला असताना संबंधिताने या सर्व गोष्टींचा ‘जुगाड’ कसा जमविला ते त्यांनाच माहित. पण या व्यक्तीने पुण्याहून बीड जिल्ह्यात प्रवास केला. दरम्यानच्या काळात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि जिल्हाधिकार्यांनी केजमध्ये ते रहात असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीरही केला. संबंधितांना केजच्या कोव्हिड केअरमध्ये पाठविण्यात आले. आणि त्यांच्याशी संबंधित कुटुंबियांचे स्वॅब घेताना पुन्हा यांचाही स्वॅब घेतला. सामान्यांच्या बाबतीत एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर चारच दिवसात नव्याने स्वॅब घेतला जात नाही. पण थोरा मोठ्यांची गोष्टच वेगळी. पुन्हा स्वॅब घेतल्यानंतर त्याच्या अहवालातून संबंधिताने कोरोनावर ‘विजय’ मिळविल्याचे समोर आले. आणि आता आपण होम आयसोलेशनमध्ये रहावे असा‘प्रकाश’ संबंधितांच्या डोक्यात पडला. आणि अनेकांच्या होम आयसोलेशनच्या मागणीवर प्रचंड काथ्याकुट करणार्या प्रशासनाने संबंधिताला होम आयसोलेशनची परवानगीही दिली. थोरा मोठ्यांसाठी कोरोनाचे नियमही कसे शिथिल होतात याची चर्चा आता केज शहरात सुरु आहे.
प्रजापत्र | Tuesday, 04/08/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा